पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; खंबाटकी बोगदाबाहेर आढळला मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याबाहेर आढळून आला आहे. ध्रुव स्वप्नील सोनवणे (वय १९, रा. बावधन, पुणे), असे त्याचे नाव आहे. पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता. खंबाटकी बोगद्यातून बाहेर पडताना झालेल्या अपघातात तो ठार झाला आहे.

ध्रुव सोनवणे हा दि. १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटूंबीयांनी हिंजवडी, पुणे येथे ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. गेले पाच दिवस कुटुंबीय आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. तब्बल पाच दिवसानंतर अपघाताची घटना उघडकीस आल्यानंतर ध्रुव सोनवणे याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

साताऱ्याहून परत जाताना झाला अपघात

ध्रुव स्वप्नील सोनावणे हा त्याच्या टीव्हीएस आपाची दुचाकीवरून (क्र. एम. एच. १२ व्ही. यू. ८७८ ) दि. १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घराबाहेर पडला. पुण्याहून अतित (ता .सातारा) पर्यंत आला आणि तेथून परत पुण्याकडे जाताना पहाटे चारच्या सुमारास खंबाटकी बोगद्याच्या बाहेरील वळणावर दुचाकीसह तो चरीत कोसळला. गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

अपघातानंतर ध्रुव हा चरीत पडला. या ठिकाणी गवत वाढल्यामुळे तो कोणाच्याही नजरेस पडला नाही. शुक्रवारी गवत कापण्याचे काम सुरू असताना मजुरांना मृतदेह दिसला. पाच दिवस मृतदेह राहिल्याने कुजण्यास सुरुवात झाली होती.

खंडाळा, भुईंज पोलिसांची तत्परता

अपघाताची घटना उघडकीस आल्यानंतर भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, खंडाळ्याच्या पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, पोलीस हवालदार संजय पोळ, शरद यादव, प्रकाश फरांदे, सचिन शेलार, दत्ता दिघे यांच्यासह शिरवळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे खंडाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.