पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर नजिक अपघात महिलेचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत रस्त्यावर दुचाकी घसरून खाली पडलेल्या महिलेला 10 चाकी कंटेनर खाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.

अर्चना राजाराम पाटील (रा. कुसुर, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून अक्षय उत्तम पाटील असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे सेवा रस्त्याकडेला झालेल्या दलदलीसह त्यातील खडी पडली आहे. या दरम्यान, अर्चना पाटील आणि अक्षय पाटील हे शनिवारी घारेवाडी येथे औषध आणण्यासाठी निघाले होते. कोल्हापूर ते पुणे या सेवा रस्त्यावरून ते घारेवाडीकडे जात असताना मलकापूर येथे रस्त्यावरील चिखलाने दुचाकी घसरली. त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या अर्चना पाटील सेवा रस्त्यावर पडल्या.

याचवेळी तेथून जात असणाऱ्या दहा चाकी कंटेनरने त्यांना चिरडले. यात अर्चना पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय हा सुद्धा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे दादा शिंगण घटनास्थळी आले व त्यांनी स्वतः अर्चना पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला. तसेच जखमी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रस्त्यावरील चिखल व खड्ड्यांमुळे झालेल्या या अपघाताने दादा शिंगन यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरील खड्डे तात्काळ मुजवा, अशी मागणी करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. अचानक आंदोलनाची भूमिका घेतल्याने पोलिसांची पळापळ झाली. दरम्यान दादा शिंगण यांच्या मागणीचा तात्काळ विचार केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर दादा शिंगन यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या घटनेची नोंद पोलिसांकडून करण्याचे काम सुरू होते.