सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच रंगत आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. अशातच साताऱ्यातून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावत आहे. आज बिचकुलेनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी, त्याने उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यावरही टीका केली. तसंच महिलांना 25 लाख रुपये १ टक्के व्याजाने देणार अशी योजना आणणार, अशी घोषणाही बिचुकले यांनी केली.
अभिजित बीचुकले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बीचुकले म्हणाले की, ‘अभिजीत बिचकुले हा अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे. आज त्याने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी त्याने लाडकी बहिण योजनेपेक्षाही भारी योजना आणणार असं जाहीर केलं. फक्त १५०० रुपये देऊन काही होणार नाही. आमदार म्हणून जर निवडून आलो तर प्रत्येक महिलेला २५ लाख रुपयांचं कर्ज महिलांना देणार आहे. ज्या महिला छोटी-मोठी कामं करतात, जसं भाकरी तयार करतात, हॉटेल चालवतात, अशा महिलांना 25 लाख रुपये १ टक्का व्याजाने कर्ज देणार अशी योजना आणणार आहे, अशी घोषणाच बिचुकलेनं केली.
‘मटणासाठी दारूसाठी मिंदे होऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी वैचारिक वारसदार आहे. साताऱ्यात दोन्ही राजे बंदुका काढुन सातारकरांना स्तब्ध करतात. मात्र स्वत:च्या गरजेला दोन्ही राजे भांडण मिटवून दोन्ही राजे पप्पी-झप्पी घेतात. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे माझे गुरू भाऊच आहेत. मी दोन्ही राजेंचं नाक दाबतोय कारण हे दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचारी भाजपसोबत आहेत, असा आरोपच बिचुकलेनं केला.
‘अजित पवार यांनी सिंचन घोटाळा केला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग त्यांना सोबत का घेतलं? शरद पवार यांच्या सांगण्यावरून उदयनराजेंना पाडलं होतं. मग अभिजित बिचकुलेच्या सांगण्यावरून शिवेंद्रराजेंना रजेवर पाठवा. त्यांच्याकडे काहीच विकास कामं नाही. जर त्यांच्याकडे विकासाचा जाहीरनामा असेल तर मी ऐकायला तयार आहे, जर नसेल तर त्यांनी माझा जाहीरनामा ऐकावा, त्यांच्याकडे फक्त सुरुची प्रायव्हेट लिमिटेड आहे, असं म्हणत शिवेंद्रराजेंना बिचुकलेनं चॅलेंजच दिलं.