तुला जिवंत सोडत नाही म्हणत ‘त्यांनी’ युवकावर केला कोयत्याने हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराडात पूर्ववैमन्यातून हल्ल्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना कराड येथील सह्याद्री दूध डेअरीसमोर घडली. आपल्या आजीचे औषध आणण्यासाठी गेलेल्या एका युवकावर धारदार कोयत्याने ४ जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना कराड शहरातील मंगळवार पेठेत मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात आयेजरजा अल्ताफ मुजावर (वय १९, रा. गुरूवार पेठ, कराड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

सुरज धुमाळ, अजय रायते, प्रथमेश बेंद्रे यांच्यासह अन्य एकजण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कराड शहरात एकच गल्बला उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहरातील गुरूवार पेठेत राहत असलेल्या आयेजरजा मुजावर याच्या मित्राचा शिवराज माने याच्याशी यापूर्वी वाद झाला होता. या वादानंतर शिवराज माने याच्यासह त्याचे मित्र आयेजरजा याच्या गल्लीतील मुलांना शिवीगाळ, दमदाटी करीत होते.

दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आयेजरजा हा नागरी आरोग्य केंद्रात त्याच्या आजीची औषधे आणण्यासाठी गेला होता. तेथून परत घरी जात असताना सह्याद्री दूध डेअरीसमोर अचानक सुरज धुमाळ आणि प्रथमेश बेंद्रे या दोघांनी आयेजरजा यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी मारली. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादावादीवेळी तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून आरोपींनी त्याच्यावर दुचाकीच्या डिकीतून आणलेल्या धारदार कोयत्याने वार केले.

आरोपींची हल्ला करताच आयेजरजा याने हे त्यांचे हल्ले चुकवले. या झटापटीत आयेजरजाच्या हातावर एक घाव वर्मी लागला. यावेळी हल्लेखोरांनी त्याला फरशीनेही मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.