सातारा प्रतिनिधी । सातारा – लोणंद महामार्गावर पिंपोडे खुर्द येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. स्वप्नील रामचंद्र माने (वय २२, रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) असे अपघातात मरित्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवार, दि. २३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास स्वप्नील माने हा युवक मित्राच्या दुचाकीवरून सातारा-लोणंद राज्य महामार्गावरून पद्मावती नावाच्या शिवारात जाण्यासाठी वाठारच्या दिशेने निघाला होता. महामार्गावरून जात असताना जगदाळे वस्तीसमोर एका अज्ञात वाहनाने स्वप्निलच्या दुचाकीस जोरात धडक दिली. या धडकेनंतर स्वप्निलच्या डोक्यास व हातापायाला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडला.
या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस पाटील अमोल कदम यांनी तत्काळ स्वप्नील याच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर अमोल पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्वप्नील याला सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी स्वप्नील याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेबाबत संजय माने यांनी वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार सहदेव तुपे करीत आहेत.