कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने विश्रांती घेतली असून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरूच आहेत. दरम्यान, कोयना नदीपात्रातील पाण्यात वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या असताना पाटण तालुक्यात वनकुसवडे वस्तीतील युवक वाहून गेल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अशोक धोंडिबा मिसाळ (वय २३, वनकुसवडे, पळासरी वस्ती, ता. पाटण) असे युवकाचे नाव आहे.
कोयना धरणातून ५२ हजार क्युसेक विसर्ग कायम ठेवून पाणीसाठा ८६.६३ टीएमसीपर्यंत स्थिर ठेवला आहे. सातारा जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून संततधार पाऊस सुरू असून पावसाचा जोर पश्चिमेकडे जास्त असून पाटण, जावली, महाबळेश्वरला तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोयना नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांनाही पूर आला आहे. शनिवारी रात्री पाटण तालुक्यात वनकुसवडेतील पळासरी वस्तीमधील अशोक धोंडिबा मिसाळ (वय २३) हा युवक शनिवारी वाहून गेल्याची घटना घडली.
सायंकाळी चरायला गेलेली जनावरे आणण्यासाठी मिसाळ गेला होता, मात्र गावानजीकच्या ओढ्यात तो वाहून गेला. कोयना धरणात सुमारे ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.