रक्षाबंधनासाठी सातारला येत असताना दुचाकीची एसटीला धडक, अपघातात युवकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकीने धडक दिली. या अपघातात आदित्य संजय साळुंखे (वय २३, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा), या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आदित्य हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील योगिता डेंटल कॉलेजला बीडीएसच्या चौथ्या वर्षात शिकायला होता. रक्षाबंधनानिमित्त तो पल्सर मोटरसायकलवरून पोलादपूर, महाबळेश्वरमार्गे सातारला येत होता. इतका लांबचा प्रवास सुरक्षितपणे पार पडला असताना आणि सातारा अवघ्या २४ किलोमीटर अंतरावर असताना मेढा हद्दीत त्याच्यावर काळाने घाला घातला.

रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास सातारा बाजूकडून आलेली एसटी बस स्थानकात जाण्यासाठी उजवीकडे वळली. त्यावेळी साताराच्या दिशेने येत असलेल्या आदित्यची मोटरसायकल अचानकपणे आडव्या आलेल्या एसटीवर आदळली. या अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला. त्याचे हेल्मेटही तुटले.
अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी अपघात स्थळी धाव घेतली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर आदित्य बोलत होता. त्याने आपल्या भावाला फोन करण्यास सांगितले. कुटुंबीयांना कळविल्यानंतर नागरीकांन जखमी आदित्यला मेढा ग्रामीण रुग्णालयात आणले. पण तो गंभीर जखमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्याला सातारला आणण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. आदित्यच्या अपघाती निधनाची माहिती कळताच सर्वांना धक्का बसला. त्याचे कुटुंब शोकसागरात बुडाले. त्याच्यासोबत खेडला शिकणाऱ्या त्याच्या मित्रांनी सातारला धाव घेतली.