सातारा प्रतिनिधी | एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावणाऱ्या तरूणाला पकडून जमावाने चोप दिला. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील करंजे परिसरातील बसप्पा पेठेत ही थरारक घटना घडली. याप्रकरणी तरूणावर पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील एका इमारतीच्या परिसरात भर दिवसा महाविद्यालयीन तरूणाने एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याने मोठी खळबळ उडाली. “माझ्याबरोबर आत्ताच पुण्याला चल, नाहीतर खून करेन, अशी धमकी तो मुलीला देत होता. घटनास्थळी जमलेले लोक आणि शाळकरी मुलगी सुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तो प्रेमवीर कुणाचेच ऐकत नव्हता.
ही गोष्ट निदर्शनास आल्यावर तेथे युवक व अन्य नागरिक जमा झाले होते. त्यातील एकाने शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे हवालदार सागर निकम यांना फोन केला. मुलगी अडचणीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागर व हवालदार धीरज मोरे तातडीने त्या ठिकाणी गेले. तेव्हा संबंधित मुलगा मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिस व नागरिकांनी दहा-पंधरा मिनिटे त्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलगा मुलीला सोडायला, तसेच चाकू टाकून द्यायला तयार होत नव्हता.
त्यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत एकाने समोरून मुलाशी बोलत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा पाठीमागून हळूवारपणे नेमुलाच्या मागे गेला. मुलाच्या जवळ गेल्यावर योग्य वेळ साधत त्यांनी त्या मुलाचा चाकू धरलेला हात पकडला. त्यानंतर त्या मुलीला ओढून बाजूला घेतले.
मुलगी व चाकू मुलाच्या ताब्यातून सुटल्यावर संतापलेला जमाव त्या मुलावर तुटून पडला. जमावाला बाजूला घेत त्यांनी त्या मुलाला कसेबसे घटनास्थळावरून बाहेर काढत शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना त्यांनी घटनेची माहिती देत मुलाला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर संबंधित मुलगा व मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. संबंधित मुलगा व मुलगी एकाच परिसरात राहतात. मुलगा १८ वर्षांचा असून, मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. या प्रेमवीराला पोलिसांनी अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर अधिक तपास करत आहेत.