सातारा प्रतिनिधी । राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना ३ कोटीची खंडणी मागितलेल्या संबंधित संशयित महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यानंतर आज दुपारी महिलेला साताऱ्यातील जिल्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले. यावेळी न्यायालयाकडून महिलेला दि. 24 मार्चपर्यंत ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 1 कोटी खंडणीची मागणी देखील केली. त्यानुसार 1 कोटी रुपये तिला देण्यात आले. मात्र, जेव्हा ती रक्कम महिलेला देण्यात आली. तेव्हा ती रक्कम स्वीकारताना रक्कमेसहीत सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेला रंगेहात अटक केली.
दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात महिलेला हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत संशयित महिलेच्या बाजूने वकील नितीन गोडसे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला तसेच महिलेवर केलेले आरोप फेटाळले. जाणूनबुजून या महिलेला अडकवण्यासाठी हे सगळं केलं गेले आहे. या महिलेचे आधीचे वकील यांनीच या महिलेला फसवले आहे आणि या महिलेने कुठेही पैशांना हात लावलेला नाही, असे गोडसे यांनी सांगितले.
आरोपी महिलेच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी देखील त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडली. तसेच महिलेच्या 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी देखील केली. अटक केलेल्या महिलेसोबत इतर कोणी आहे का? याचा अधिक तपास करता यावा, सहभागी व्यक्तींचा शोध सुरु असल्याने या महिलेची पोलीस कोठडी अजून काही दिवस आवश्यक असावी, या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेच्या सह्यांचे नमुने एक्सपर्टकडून तपासायचे असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे महिलेच्या आणखी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने 3 दिवसांची महिलेला पोलिस कोठडी सुनावली. त्यानुसार 25 पर्यंत महिलेला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यालाही अटक
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार याला दहिवडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार याचा सहभाग असल्याचा आरोप असून दहिवडी येथील न्यायालयात अनिल सुभेदार यांना पोलिसांनी हजर केले. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला तुषार खरात हा संबंधित महिलेच्या अधिक संपर्कात असल्याचे आणि सुभेदार हे खरात व संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक पुराव्यात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दहिवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.