सातारा प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा 2) अंतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात ३७ हजार ३८७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून २८ हजार ७२४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत केला आहे. त्यापैकी २७४ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत. यामध्ये फक्त ३५ दिवसांमध्ये माण तालुक्यातील स्वरुपखानवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील श्रीमती संगीता उत्तम कदम यांनी घरकुल बांधून पूर्ण केले आहे. हा जिल्ह्यातील एक विक्रम ठरला आहे. यापूर्वी २०१६ -१७ मध्ये माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील श्रीमती शालन बबन निंबाळकर यांनी ६१ दिवसांत घरकुल बांधण्याचा उच्चांक प्रस्थापित केला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी घरकुलांच्या मंजुरीसाठी व कामे गतीने पूर्ण होण्यासाठी आढावा घेवून सुचना दिल्या आहेत. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांमार्फत गतीने कार्यवाही सुरु आहे. जी कुटुंबे घरकुलासाठी पात्र आहेत परंतु त्यांची नावे प्रतिक्षा यादीत नाहीत अशा कुटुंबांचे घरकुलाच्या लाभासाठी एप्रिल 2025 मध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून आवास प्लस अॅपव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील गरजू लाभार्थींनी घेवून सर्वेक्षकांना अचूक माहिती उपलब्ध करुन दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
१३२ आदिवासी कातकरी कुटुंबांना घरकुल
भूमिहिन बेघर लाभार्थी कुटुंबांना शासकीय जागा, गायरान मधील सार्वजनिक उपक्रमांतर्गत जागा, ग्रामपंचायत मालकीच्या जागा, पंडीत दिन दयाळ उपाध्याय घरकुल करीता जागा खरेदी अर्थ सहाय योजना अंतर्गत कमाल अर्धा गुंठा जागा (खरेदीसाठी कमाल एक लाख मर्यादेत-शासकीय दर) इत्यादी माध्यातून जागा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत करण्याची कार्यवाही सुरु आहे. या कामात महसुल विभाग पूर्णपणे सक्रिय आहे. प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत १३२ आदिवासी कातकरी कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी शासकीय जागा उपल्बध करुन त्यांची या जागेत घरकुले मंजूर केलेली आहेत
तालुका निहाय घरकुल मंजुरी व पूर्ण झालेल्या घरकुलांची सद्यस्थिती
जावली : मंजूर घरकुल :1800, पूर्ण घरकुल : 8
कराड : मंजूर घरकुल : 5031, पूर्ण घरकुल : 98
खंडाळा : मंजूर घरकुल : 1435 : पूर्ण घरकुल 20
खटाव : मंजूर घरकुल : 3984, पूर्ण घरकुल : 10
कोरेगांव : मंजूर घरकुल : 3378, पूर्ण घरकुल : 28
महाबळेश्वर : मंजूर घरकुल : 889, पूर्ण घरकुल : 31
माण : मंजूर घरकुल : 3125, पूर्ण घरकुल : 24
पाटण : मंजूर घरकुल : 7822, पूर्ण घरकुल : 21
फलटण : मंजूर घरकुल : 3369, पूर्ण घरकुल :23
सातारा : मंजूर घरकुल : 4756, पूर्ण घरकुल : 9
वाई : मंजूर घरकुल : 1798, पूर्ण घरकुल : 2