सातारा प्रतिनिधी | कवठे, ता. वाई येथे शनिवारी एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळली. त्यामध्ये ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेने जुन्या धोकादायक घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रेश्मा रूपेश पोळ (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर रूपाली प्रशांत पोळ (वय ३२) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
कवठे येथील शंकरराव पोळ यांच्या जुन्या घराची पाठीमागील मातीची भिंत गेल्या काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत होती. शनिवारी अचानक ही भिंत कोसळली. या भिंतीखाली रेश्मा पोळ या गाडल्या गेल्या. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भिंतीचा राडारोडा बाजूला काढून दोघींना बाजूला काढले. त्यांना कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी रेश्मा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर रूपाली पोळ यांना अधिक उपचारासाठी सातारा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.