पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडी नजीकच्या मणदुरे येथे गुरुवारी एक अनोखी निसर्गपूजा पार पडली. जेजुरीतील मार्तंड-जानाईदेवीच्या भक्तांनी निसर्ग पूजेच्या सोहळ्यात सहभाग घेतला. जेजुरीकरांनी निसर्गाला गुलाल, नारळ आणि भंडारा अर्पण करून निसर्गाचे जतन करण्याचे आवाहन केले.
सातारा जिल्ह्यातील निसर्गप्रेमी आणि समस्त जेजुरीकर गावकऱ्यांनी आपली शेकडो वर्षांची धार्मिक यात्रा उत्सव पालखी सोहळ्याला पर्यावरण रक्षणाची जोड देवून जनजागृती करत वसुंधरा उत्सव साजरा करीत आली आहे. आपल्या धार्मिक परंपरा व श्रध्देनुसार भक्तांनी सह्याद्री पर्वत रांगांमधील उंच कड्यावरून निसर्गाला नारळ गुलाल- भंडारा अर्पण करुन निसर्गपूजा साजरी केली आहे.
जेजुरीची ग्रामदैवता असलेल्या जानाईदेवीची पायी पालखी पदयात्रेचे जेजुरी येथून आठवड्यापूर्वी प्रस्थान झाले. ही पालखी काऊदऱ्यावर दाखल झाल्यानंतर जानाईदेवी अन्नदान पदयात्रा सेवा आणि जेजुरी ग्रामस्थांतर्फे आयोजिलेल्या निसर्गपूजेला सालाबादप्रमाणे प्रतिसाद मिळाला.
या यात्रेत भाविकांनी दीडशे किलोमीटरचा प्रवास करून काऊदऱ्यावर पोहोचले. तेथे निसर्गपूजा संपन्न झाल्यानंतर मुक्कामी जानुबाई निवकणे येथे यात्रा उत्साहात संपन्न झाली. स्थानिक डोंगरवासी महिलांना साडीचोळी आणि वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. वसुंधरेला भंडारा उधळून हरितक्रांती आणि पर्जन्यवृष्टीकरिता प्रार्थना केली गेली. निसर्गपूजा सोहळ्यास जेजुरी ग्रामस्थांसह निसर्गप्रेमींनी मोठी उपस्थिती दर्शवली. हा सोहळा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरला आहे.