सातारा प्रतिनिधी । सातारा – महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात मुकवली येथे महाबळेश्वरहून सातारा बाजूकडे निघालेली दुचाकी दरीत कोसळल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, दुचाकीवरील विवाहित महिला व पुरुष घटनास्थळी न सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान, सोमवारी देखील शोधमोहीम राबविण्यात आली असून अजून पुढील कांगी दिवस या प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
विवाहिता स्वाती अमोल मोहिते, विक्रम युवराज मोहिते (रा. साप, ता. कोरेगाव) अशी दुचाकीवरील बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथे नातेवाइकांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी मोहिते कुटुंबीय शनिवार दि. १५ रोजी गेले होते. वास्तुशांती कार्यक्रमानंतर मोहिते कुटुंबीयांपैकी काही जण एसटीने साप, रहिमतपूर या ठिकाणी गेले. तर स्वाती मोहिते व विक्रम मोहिते हे दुचाकीने क्षेत्र महाबळेश्वर येथे दर्शन घेऊन घरी येतो, असे सांगून निघून गेले होते. मात्र, रविवार दि. १६ मार्च रोजी चार वाजेपर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क झाला नाही.
मोहिते कुटुंबीयांकडून केळघर घाटात शोधमोहीम सुरू असताना स्वाती मोहिते यांचे पती अमोल मोहिते यांना दरीमध्ये त्यांची दुचाकी निदर्शनास आली. त्यांनी दरीत जाऊन पाहणी केली असता दुचाकीवरील दोघे जण दिसून आले नाहीत. याबाबतची माहिती अमोल मोहिते यांनी तत्काळ मेढा पोलिसांना दिली. यावेळी दरीसह जंगलामध्ये शोधमोहीम त्यांनी राबविली. परंतु स्वाती मोहिते व विक्रम मोहिते यांचा शोध लागला नाही. दरम्यान, आज सोमवार पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली मात्र, आज देखील काही सापडले नसले तरी शोधमोहीम पुढे राबविणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.