कराड प्रतिनिधी | भेदा चौकात शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. उर्दू हायस्कूलकडून आलेल्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिली आणि बॅरिकेड्स तोडून भेदा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारात घुसला. या अपघातात हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. भर चौकातील अपघाताच्या थराराने एकच पळापळ झाली. अपघातग्रस्त ट्रक चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली.

शनिवारी रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते. तुरळक वाहतूक सुरू होती. उर्दू हायस्कूलकडून येणारा ट्रक आयलॅंडला वळसा घालून न येता चुकीच्या बाजूने आला. त्याचवेळी दुसरा ट्रक पोपटभाई पेट्रोल पंपाच्या बाजूकडून उर्दू हायस्कूलकडे निघाला होता. त्या ट्रकला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली आणि बॅरिकेड्स तोडून थेट भेदा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारात घुसला. अपघातामुळे भेदा चौकात मोठा आवाज झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली.
सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, भेदा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले. दुसरा ट्रक पुढे जाऊन थांबला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीला पांगवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातामुळे रात्री उशिरापर्यंत भेदा चौकात बघ्यांची गर्दी होती.
‘त्या’ अपघाताची आठवण झाली ताजी
भेदा चौकात काही महिन्यांपूर्वी नामांकित बालरोग तज्ज्ञाच्या दुचाकीला उडवलं होतं. त्या अपघातात डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हापासून भेदा चौक अपघाताचे ठिकाण बनला आहे. चौकात सिग्नल असला तरी घाईगडबडीत वाहने दामटण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण मिळत आहे. शनिवारी रात्री झालेला अपघात थरारक होता. सुदैवाने अपघातावेळी चौकात वाहने नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.