सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जुन्या टोल नाका भागात सर्व्हिस रस्त्यावर माल ट्रकने 10 वाहनांना भीषण धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, आठ ते दहा वाहनाचा चक्काचूर झाला असून यातील सुमारे १२ प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनस्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मालट्रक क्रमांक आर जे ०९जि डी २८९८ हा निघाला होता. यावेळी ट्रक खंडाळा येथील जुन्या टोल नाका भागात सर्व्हिस रस्त्यावर आला. यावेळी भरधाव वेगात असलेल्या ट्रकने अचानक समोरील असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. सर्व्हिस रस्त्यारन निघालेल्या रिक्षा, स्वीफ़्ट, महिंद्रा कंपनीची कार अशा दहा वाहनांवर ट्रक भरधाव वेगाने गेल्याने यामध्ये असलेले प्रवासी जखमी झाले.
ट्रकच्या धडकेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचे नुकसान झाले असून प्रवासीही गंभीर जखमी झाले. या अचानकपणे झालेल्या भीषण धडकेच्या आवाजाने परिसरात असलेल्या इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ अपघाताची माहिती खंडाळा पोलीस, भुईंज महामार्ग पोलीस, शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांना दिली.
माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलीस व रेस्क्यू टीमचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या सहकार्याने जखमींना खंडाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खंबाटकी बोगदा परिसरात झालेल्या या विचित्र अपघातात कारला (एमएच ११-एडब्ल्यू ७६७६) जोरदार धडक बसली. दोन्ही बाजूंनी कार चेपल्याने मोठे नुकसान झाले. सातारा येथील शिक्षक बँकेचा शताब्दी कार्यक्रम उरकून ते खंडाळ्याला निघाले होते. मात्र, या कारमधील पाच शिक्षक बचावले.
अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातातील वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांकडून उशिरापर्यंत अपघाताची चौकशी सुरु होती.
नेमका असा झाला अपघात
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून रविवारी ‘एस’ वळणावरून जाताना कंटेनर चालकाचा ताबा सुटला. यामुळे कंटेनरने पुढे चाललेल्या सहा वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही वाहने एकमेकांना धडकली. वास्तविक रविवारची सुटी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती.