सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना घडल्याचे उघड झाले आहे. कोळसा कारखान्यात काम करणाऱ्या एका कातकरी समाजातील आदिवासी महिलेवर तब्बल 11 जणांनी तिच्या पतीला खोपीत डांबून ठेवत सामूहिक अत्याचार केला असल्याचा आरोप स्वतः महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रफीक लतिफ शेख उर्फ बाळुशेख यास ताब्यात घेतले आहे. हि धक्कादायक घटनासुमारे 15 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका कोळसा कारखान्यात घडली आहे. साताऱ्यातील घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड मधील एक कातकरी समाजातील आदिवासी कुटुंब फलटण येथे कोळसा कारखान्यात काम करण्यासाठी आले होते. काम करत असताना येथील 11 जणांनी आदिवासी महिलेसह तिच्या पतीला खोलीत कोंडले. तसेच महिलेवर अत्याचार केला. अत्याचाराची घटना घडल्यानंतर महिला आणि तिच्या पतीने रात्रीत मुलगा व पाच वर्षाच्या मुलीसह पंढरपूर गाठले. तेथून पुन्हा रायगडला आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी मामाला घडलेला प्रसंग सांगितला.
त्यानंतर मामाने पीडित महिलेसह पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच विरार पूर्व येथील पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद घेतल्यानंतर सातारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सातारा पोलिसांनी सबंधित पीडित महिलेला जबाब नोंदवण्यासाठी फलटण येथे आपल्यासोबत घेऊन गेले. महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिस अधीक्षकानी तात्काळ कोळसा कारखान्याचा मालक रफीक लतिफ शेख उर्फ बाळुशेख (रा. सोनवडी बुद्रुक,ता. फलटण) याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सायंकाळी फलटणचे पोलिस उपअधीक्षक राहुल धस, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. तसेच तेथील पाहणी करून प्राथमिक चर्चा देखील केली. या घटनेतील अन्य इसमांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर असताना घडली घटना…
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या दौऱ्या दरम्यान अशा महिला अत्याचाराच्या घटना घडणे ही खूप गंभीर बाब आहे. शिवाय त्याही एक महिला असल्यामुळे फलटण येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरून गेला आहे. परिणामी महिलांची सुरक्षा आणि कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.