कराड प्रतिनिधी | ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. कराड-तासगाव मार्गावर कार्वेचौकी, ता. कराड गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
अरविंद मधुसूदन चिपाडे (वय, ६४. रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि.सांगली) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले मच्छिंद्रगड येथील अरविंद चिपाडे हे पत्नी स्नेहल यांच्यासह बुधवारी दुपारी कराडला आले होते. ते कराड येथील आपले सर्व काम आटोपून गावी किल्ले मच्छिंद्रगडला दुचाकीवरून निघाले होते. कराड-तासगाव मार्गावरून जात असताना ते कार्वे चौकीपासुन काही अंतरावर रस्त्याकडेला थांबले.
याचवेळी कार्वे गावाकडून कृष्णा कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर वेगाने निघाला होता. काही कळण्याच्या आतच भरधाव ट्रॅक्टरने अरविंद चिपाडे यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने चिपाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.