कराड प्रतिनिधी । तब्बल 21 वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावात महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती. संबंधित महिलेचा खून हा खटाव तालुक्यातील भूषणगड येथील एक युवकाने केला असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून संबंधित आरोपी हा फरार होता. त्या आरोपीस तब्बल 21 वर्षानंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. किसन नामदेव जाधव (रा. भुषणगड ता. खटाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील एकसळ या ठिकाणी घडलेल्या घटने प्रकरणी संबंधित फरार आरोपीस पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक तयार केले.
काल दि. 26 जुलै रोजी पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना आरोपी हा भूषणगड ता. खटाव येथे मेंढपाळ म्हणून वावरत असल्याची मिळाली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील नेमले पथकास दिली. माहिती मिळताच संबंधित पथक तात्काळ भूषणगड ता. खटाव येथे दाखल झाले. त्या ठिकाणी संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. तसेच कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रविद्र भोरे, पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील व सफो सुधीर बनकर, पो.हवा. सचिन साळुंखे, सनी आवटे, पो.ना. अमित सपकाळ, पो. कॉ. धीरज महाडीक यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला.
अशी घडली होती खुनाची घटना
कोरेगाव ता. कोरेगाव गावचे हद्दीतील लक्ष्मीनगर येथे राहते घरामध्ये दि. २२/०२/२००२ रोजी १९.३० से २३/०२/२००२ रोजी १७.३० वा. दरम्यान मालन बचन बुधावले (वय 35, रा. एकसळ ता. कोरेगाव जि. सातारा) हि महिला मृत अवस्थेत मिळुन आलेलो होती. तिचा किसन नामदेव जाधव रा. भुषणगड ता. खटाव याने खुन केलेबाबत चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द कोरेगाव पोलीस स्टेशन गुरनं ११ / २००२ मादविसंक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा आरोपी हा गुन्हा घडलेपासून अद्यापर्यंत फरारी होता. तो आपली स्वतःची ओळख लपवुन मेंढपाळ होऊन खटाव व कोरेगाव परिसरात वाड्यावस्त्यावर वावरत होता. त्याचा अनेकवेळा पोलीसांनाकडुन शोध घेतला जात होता. मात्र, त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता.