कराड प्रतिनिधी | गावठी पिस्तुल विक्रीकरता आलेल्या एकास शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. करवडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन गावठी बनावटीची पिस्तुल व एक दुचाकी असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दादा उर्फ युसुफ दिलावर पटेल (वय 45, रा. वाघेरी, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड शहर व परिसरातील अवैध शस्त्रे शोधून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पाटण तालुक्याचे डीवायएसपी विवेक लावंड,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना सूचना दिल्या होत्या. यावर काम करत असतानाच करवडी फाटा येथे एकजण गावठी पिस्तुल बाळगून चोरटी विक्री करण्याच्या इराद्याने थांबला आहे अशी माहिती राजू डांगे यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक डांगे यांनी पथक घेऊन करवडी फाटा येथे सापळा रचून छापा टाकला. यावेळी दादा पटेल हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला झडप घालून पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे वजा पिस्तुल व एक दुचाकी असा सुमारे दोन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे करीत आहेत.