‘लाडक्या बहिणीं;चं टेन्शन वाढलं! आता चारचाकी आहे की नाही घरोघरी जाऊन तपासणीला सुरुवात

0
2110
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”तील (Ladki Bahin Yojana) बोगस लाभार्थ्यांच्या पडताळणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी आहे, अशांना या योजनेच्या यादीतून वगळले जाणार आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेकडे शासनाच्या आरटीओ विभागाकडून चारचाकीवाल्या ‘बहिणीं’ची यादी देण्यात आली आहे. यानुसार आता अंगणवाडी सेविकांनी ‘बहिणीं’च्या घरी जाऊन पडताळणीच्या सर्व्हेस सुरुवात केली आहे. आता प्रत्यक्ष अहवाल आल्यानंतरच सातारा जिल्ह्यातील किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार? आणि किती पात्र हे स्पष्ट होणार आहे.

राज्यात महायुती सरकारचे मागीलवर्षी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना सुरू करून त्यांना अर्थसहाय्य केले. या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात असून आतापर्यंत तब्बल नऊ हप्ते लाडक्या बहिणींनी घेतले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने राज्यातील बहिणींना महिन्याला दीड हजारावरुन २ हजार १०० रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. याचा फायदाही महायुतीला झाला. त्यातच आता लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये देण्यापूर्वीच निकषात न बसता लाभ घेतलेल्या महिलांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अपात्र बहिणींना आता या योजनेतून बाहेर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

सातारा जिल्ह्यात अजुनही अनेक महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र आहेत. पण, सध्या अर्ज भरुन घेणेच बंद आहे. त्यामुळे संबंधित महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशात आता ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहार त्या लाडक्या बहिणीला या योजनेतून वागळण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

लाभार्थीची घरोघरी जाऊन चौकशी

दरम्यान, या योजनेच्या लाभार्थीची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. ज्यांच्याकडे कार आहे, अशांची यादी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या परिवहन विभागाकडून घेतली असून ती प्रत्येक जिल्‌हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. या याद्यांनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) यांनी तालुका पातळीवर हि यादी पाठवली असून पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन पडताळणी करणार आहेत.

आरटीओकडून चारचाकीची यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी आहेत. त्या लाभार्थींच्या घरी चारचाकी वाहने आहेत का? त्याची पडताळणीला करण्याच्या सूचना मंत्रालयाकडून देण्यात आल्या. तसेच संबंधित आरटीओ विभागाकडून प्राप्त झालेली यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुका निहाय पातळीवर पाठवण्यात आलेली आहे. तालुका निहाय अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत प्रत्यक्ष त्या लाभार्थी महिलेच्या घरी जाऊन माहिती घेतली जाणार आहे.

शहानिशा केल्यानंतर अंतिम अहवाल प्राप्त होणार : विजय तावरे

सातारा जिल्ह्यात आरती विभागाकडून पटपट झालेल्या यादीनुसार साधारण १२ हजार इतक्या संख्येत महिला, कुटुंबे यांची यादी आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी गाडी आहे का? याची शहानिशा केली जाणार आहे. यानंतर अंतिम अहवाल प्राप्त होईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

‘या’ ३ गोष्टी असल्यास लाडक्या बहिणीनो १५०० विसरा

1) अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
2) चारचाकी वाहन असणे
3) लग्नानंतर इतर राज्यात वास्तव्य

सातारा जिल्ह्यातील माहिती…

योजनेसाठी प्राप्त अर्ज : ८,३३,२१३
मंजूर अर्ज : ८,१९,५४९
नामंजूर अर्ज : २,०३५
योजनेचा लाभ – २१ ते ६५ वयोगटातील महिला

तालुकानिहाय अर्ज मंजूर…

जावळी : ३०,७६४
कराड : १,५३,३९५
खंडाळा : ३८,६५३
खटाव : ७९,१५९
कोरेगाव : ७२,७२८
महाबळेश्वर : १६,८९२
माण : ६२,६५६
पाटण : ८६,९६१
फलटण : ९५,९५६
सातारा : १,२७,०८९
वाई : ५५,२६६