सातारा प्रतिनिधी । स्वतःला दुर्धर आजार झाल्याच्या संशयाच्या भीतीनंतर आपल्या पश्चात मुलालाही दुर्धर आजार होईल, मग त्याचा सांभाळ कोण करणार?, त्याचे हाल होतील, या विचारातून पोटच्या पोराचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून स्वतः बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत बापानेच मंगळवारी दुपारी पोलिसांत कबुली दिली. हिवरेतील खून प्रकरणाचा छडा अवघ्या दोन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि वाठार पोलिसांना यश आले.
विजय आनंदराव खताळ (वय ३६, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलल्या संशयित वडिलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हिवरे येथील सहावीत शिकणाऱ्या विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) या मुलाचा शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उसाच्या फडात गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन हा खून तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
त्यानुसार कोरेगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी स्वतंत्र दोन पथके नेमली. या दोन्ही पथकांनी सर्व शक्यतांचा अभ्यास करून तपासाला सुरचवात केली. मुलाचे वडील विजय खताळ आणि गावातील काही लोकांनी सांगितलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय वडील विजय खताळ यांच्यावरच बळावला. पोलिसांच्या पथकाने विजय खताळ याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलाचा खून आपणच केल्याची त्याने कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. वाठार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्रवीं भोरे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर, अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, राकेश खांडके, अमोल माने, अजित कर्णे, सनी आवटे, शिवाजी भिसे, स्वप्नील कुंभार, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओमकार यादव, स्वप्नील दाैंड, केतन शिंदे, राेहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, अमृत कर्पे, विजय निकम, संभाजी साळुंखे, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, वाठार पोलिस ठाण्याचे नितीन भोसले, उदय जाधव, प्रशांत गोरे, गणेश इथापे, प्रतीक देशमुख आदींनी या कारवाईत भाग घेतला.