कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका मोरीमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटली असून केशवमुर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय ३७, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू), असे त्याचे नाव आहे. कराड DYSP अमोल ठाकूर यांचे पथक आणि तळबीड पोलिसांनी या घटनेची उकल केली आहे. केशवमुर्तीची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वनवासमाची हद्दीत महामार्गाच्या निर्माणाधीन मोरीत चार दिवसांपूर्वी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या घटनेचे धागेदोरे शोधून काढले. केशवमुर्तीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली. या गुन्ह्यात तीन संशयितांचा सहभागही स्पष्ट झाला आहे.
मृतदेह जाळताना एक संशयित भाजला
मृताच्याच गावातील मंजुनाथ सी (वय ३३, रा. आरेहल्ली, पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू) याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. केशवमुर्तीच्या हत्येनंतर त्याला जाळताना प्रशांत भिमसे बटवाल (रा. वमनेल-सिंगदी, जि. बिजापूर) हे गंभीररीत्या भाजला आहे. त्याच्यावर सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही.
बंगळुरात हत्या, कराड हद्दीत जाळले
मृत केशवमुर्ती याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हत्येमागील कारण तपासातच स्पष्ट होईल. दरम्यान, केशवमुर्तीला बंगळुरातून आणून खून करून कराड हद्दीत त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेच्या तपासासाठी बंगळुरूला गेलेले पोलिस पथक मंजुनाथला घेवून पहाटे कराडला परतले. बंगळुरू परिसरात खून करून कराड हद्दीत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे.
‘या’ घटनांचा होणार तपास
केशवमुर्ती याची हत्या कोठे आणि कशी केली? मृतदेह महामार्गावरील वनवासमाचीपर्यंत कसा आणला? मृतदेह जाळण्यासाठी डिझेल अथवा पेट्रोल कोठून आणले? मृतदेह जाळून संशयितांनी कसे पलायन केले? या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का? खूनाचे कारण काय? या सर्व बाबींचा तपास पोलीस करणार आहेत.