पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १० किलोमीटर अंतरावरील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस ७ किलोमीटरवर होता.
कोयना धरण सुरक्षित
भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोठेही पडझड झाली असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन आणि महसूल प्रशासनाने दिले आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने तो कोयनानगर परिसरातच जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठेही या भूकंपाने पडझड झालेली नाही.
१२ दिवसात भूकंपाचा दुसरा धक्का
कोयना धरण परिसरात दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २४ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील चांदोली (जि. सांगली) गावाच्या पुर्वेस ७ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत १७ किलोमीटर होती.
यंदाच्या वर्षातील भूकंपाचा सातवा धक्का
पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात झालेल्या भूकंपाने तालुक्यात कोठेही पडझड अथवा हानी झालेली नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या सुत्रांनी दिली आहे. 8 जानेवारी २०२३ रोजी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा वर्षातील पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी, दि. ६ मे, दि. १६ ऑगस्ट, दि. ७ सप्टेंबर, दि. २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
२०२१ मध्ये जाणवले भूकंपाचे १२८ धक्के
कोयना धरण परिसरात 2021 सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिका सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल 128 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये 3 रिश्टर स्केलच्या 119 आणि 3 ते 4 रिश्टर स्केलच्या 9 धक्क्यांचा समावेश होता. भूकंपांच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले होते.