कोयना धरणाचा परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला, कोणतीही हानी नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण परिसरात परिसरात सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २४ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील चांदोली (जि. सांगली) गावाच्या पुर्वेस ७ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत १७ किलोमीटर होती.

यंदाच्या वर्षातील भूकंपाचा सातवा धक्का

पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात झालेल्या भूकंपाने तालुक्यात कोठेही पडझड अथवा हानी झालेली नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या सुत्रांनी दिली आहे. 8 जानेवारी २०२३ रोजी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा वर्षातील पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी, दि. ६ मे, दि. १६ ऑगस्ट, दि. ७ सप्टेंबर, दि. २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

‘या’ वर्षात जाणवले भूकंपाचे १२८ धक्के

कोयना धरण परिसरात 2021 सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिका सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल 128 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये 3 रिश्टर स्केलच्या 119 आणि 3 ते 4 रिश्टर स्केलच्या 9 धक्क्यांचा समावेश होता. भूकंपांच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले होते.