कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, तीव्रता 3.1 रिश्टर स्केल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटरवर होता.

कोयना धरण सुरक्षित

भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठेही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनाने दिली आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो कोयनानगर परिसरातच जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठेही या भूकंपानं पडझड झालेली नाही.

यंदाच्या वर्षातील पहिला भूकंप

यंदाच्या वर्षातील भूकंपाचा हा पहिला धक्का बसला आहे. सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली ९ किलोमीटर होती. सौम्य धक्का असल्याने तो केवळ कोयनेतच जाणवला.

मागील वर्षात भूकंपाचे सात धक्के

कोयना खोऱ्यात २०२३ मध्ये भुकंपाचे ७ धक्के बसले होते. ८ जानेवारी २०२३ रोजी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी, दि. ६ मे, दि. १६ ऑगस्ट, दि. ७ सप्टेंबर, दि. २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.