सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवकाने आंघोळ करण्यासाठी उडी टाकली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश, सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृताचे नाव आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेकरिता उत्तरप्रदेश येथील फरसाण विक्रीकरिता साधारणपणे २० ते २५ जण आले आहेत. दरम्यान, आज सोमवारी सकाळच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रामध्ये अंघोळीसाठी संबंधित विक्रेते आले होते. यावेळी सुरेंदर नदीच्या पात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ शिरवळ पोलीस, रेस्क्यू टिमसह घटनास्थळी दाखल झाले.
शोधमोहीमेत पाण्याच्या प्रवाहामुळे सुरेंदरचा मृतदेह शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या तीन दिवसांमध्ये तीन घटना घडल्या असून नायगाव याठिकाणी मावस आजोबा व नातू, शेखमिरवाडी याठिकाणी युवक तर आज परप्रांतीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत झाली नव्हती.