कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी रस्त्यावर कोळेनजीक बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. रस्त्यावर अचानक बिबट्या आल्यानंतर वेगात असणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की कोळे- शिंगणवाडीदरम्यान रस्त्यालगत आज सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला, तसेच बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन कुसूर येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. शासकीय वाहनातून त्यास कऱ्हाड वनक्षेत्र आवारात नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा बिबट्या मादी जातीचा असून, अंदाजे दोन वर्षांचा असावा, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मलकापूर वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अभिनंदन सावंत, दशरथ चिट्टे, अभिजित शेळके, अक्षय पाटील यासह वनमजूर अर्जुन शिबे, मयूर जाधव यांनी पंचनामा केला. या रस्त्यावरील ही तालुक्यातील तिसरी घटना असून, यापूर्वी येणके-किरपे व विंग-चचेगाव रस्त्यावर बिबट्यांचा मृत्यू झाल्याने आता वन विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
महामार्गावर ही घटना घडल्याने प्राणीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नागरिकांना वाहन सावकाश चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या या प्रकारे अपघात होऊन वन्य प्राणी दगावत असल्याने नागरिकांना प्राणीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी संघटनेकडूनही वारंवार आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे अपघात वाढत असल्याने वन विभागाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.