कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या आगाशिव डोंगरा भोवतालच्या गावात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी नांदलापूरसह कापील मळ्यात व आगाशिवनगरात तर शुक्रवारी धोंडेवाडीत बिबट्याच्या कळपाचे दर्शन ग्रामस्थांना झाले. आगाशिव डोंगर परिसरात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचा कळपानेच हल्ला होत असल्यामुळे या भागात बिबट्याच्या कळपाची दहशत कायम असल्याचे दिसून आले आहे.
कराड तालुक्यातील आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात गेल्या काही महिन्यांत चचेगाव, आगाशिवनगर, जखीणवाडी, धोंडेवाडी नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या अनेक वेळा ठार केल्या आहेत. रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत.आगाशिव डोंगर पायथ्याला मुनावळे गावालगत चार शेळ्या फस्त केल्या होत्या. हा हल्ला एका बिबट्याचा नसून बिबट्यांच्या कळपाचा असावा, असा अंदाज वनविभागाने घटनास्थळी वर्तविला होता.
सुमारे एक वर्षाच्या दोन बछड्यांसह मादी बिबट्याला पाहिल्याचे काही शेतकऱ्यांनी त्यावेळीही सांगितले होते. त्यामुळे या ठिकणी बिबट्याच्या कळपाचा वावर आहे, हे सिद्ध होत आहे. त्याच पद्धतीने नांदलापूरसह कापीलमळा परिसरातील काही शेतकऱ्यांना बिबट्याच्या कळपाचे दर्शनही झाले होते, तर शुक्रवारी धोंडवाडी, ता. कराड येथे दोन बछड्यांसह मादी बिबट्याचे दर्शन झाले. तीन शेतकऱ्यांच्या समोरच रानातून तासभर फिरत फिरत बिबट्याची फॅमिली डोंगराच्या दिशेने गेली. याच शिवारात रात्री एका वस्तीवरील रेडकावर हल्ला करत पायाचा चावा घेऊन जखमी केले. बिबट्याच्या या सततच्या वावरामुळे या परिसरातील शेतकरी रानात जाण्यासाठी धजावत नाहीत. बिबट्याच्या कळपाच्या होणाऱ्या वारंवार दर्शनामुळे डोंगरालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.