सुसाट निघालेल्या दुचाकीवर बिबट्यानं घेतली झेप; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । बिबट्याकडून अनेकजणांवर हल्ले केल्याची घटना आपण अनेकदा ऐकली आणि पाहिलीही असेल. बिबट्या कधी चालताना पाठीमागून येऊन अचानक झडप घालतो तर कधी दबक्या पावलांनी जनावरांच्या गोठ्यात जाऊन शिकार करतो. अशा या बिबट्याने सुसाट निघालेल्या दुचाकीस्वारावर झडप घालून त्याला जखमी केल्याची घटना पाटण तालुक्यातील चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी रस्त्यादरम्यान घडली आहे. या हल्ल्यात सोनईचीवाडी येथील सुभाष श्रीरंग काळे हे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनाईचीवाडी येथील शेतकरी सुभाष काळे हे सोमवारी सायंकाळी पाटणहून पापर्डेमार्गे दुचाकीवरूनआपल्या घरी निघाले होते. चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी दरम्यान त्यांची दुचाकी आली असता बिबट्याने चालत्या दुचाकीवर अचानक झेप घेत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुभाष काळे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते गाडीसह रस्त्याकडेला पडले. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. यावेळी बिबट्याने त्यांच्या मानेचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगातील रेनकोटमुळे त्यांचे प्राण वाचले. दरम्यान, आक्रमक झालेल्या बिबट्याने नख्यांनी सुभाष यांच्या डोक्याला, हाताला ओरखडले.

यावेळी पाठीमागून काही नागरिकांची दुचाकी आली. नागरिकांनी त्याठिकाणी येताच आरडाओरड केली. त्यावेळी नागरिकांना पाहताच बिबट्याने सुभाष यांना सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्या जाताच जखमी झालेलुआ सुभाष यांना संबंधित नागरिकांनी तात्काळ घटनास्थळापासून शेजारी असलेल्या सुर्यवंशीवाडी गावामध्ये नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. गव्हाणवाडी, पापर्डे ते साजूर मार्गावर अनेकदा वाहनधारकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. तर बिबट्याकडून दुचाकीवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.