कराड प्रतिनिधी | तळबीड ता. कराड येथील जानाई मंदीराकडे जाणाऱ्या रोडवरील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी 29 रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याने याबाबतची माहिती सरपंच उमेश मोहिते यांना दिली. त्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती कळवण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडणार इतक्यात बिबट्याने बाहेर येत धूम ठोकली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वन विभागाचे पथक तळबीड येथील बिबट्या पडलेल्या विहिरीजवळ दाखल झाल्या नंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. या दरम्यान, परिसरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तळबीड येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याची चर्चा होती.
मात्र, एक बिबट्या शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याचे आढळून आले. दरम्यान, रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. परंतु बिबट्या पिंजऱ्यात जाण्याऐवजी बाहेर आला आणि शेत शिवाराच्या दिशेने निघून गेला.