पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बिबट्याचा थरार; शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्याच्या पश्चिमेकडे टोकावर असलेल्या पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बुधवारी दुपारी थरारक घटना घडली. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने पाठीमागून अचानक हल्ला केला. शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून बिबट्यावर दगड भिरकावल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या छातीवर तसेच हाताला गंभीर जखम झाली आहे. पोपट बाळकृष्ण जाधव (रा. गमेवाडी, ता. कराड), असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट जाधव हे दुपारी दीडच्या सुमारास पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या कुंभर नावाच्या शिवारात गेले होते. शेताच्या शेजारीच ओढा आहे. परिसरातील झाडांवर वानरांचा कळपही होता. बिबट्या त्या वानरांच्या मागावर आला होता.
पोपट जाधव हे शेतात काम करत असताना ओढ्याच्या ओघळातून वर आलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर पाठीमागून झेप घेतली. बिबट्याने छातीवर तसेच डाव्या हातावर पंजा मारला. या हल्ल्यात त्यांच्या छातीवर खोलवर जखम झाली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यावेळी पोपट जाधव यांनी हातातील दगड बिबट्यावर भिरकावला. तसेच आरडाओरडा केल्यामुळे आजुबाजुला असलेले शेतकरी धावत आले. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. शेतकऱ्यांनी जखमी पोपट जाधव यांना तातडीने कराडच्या वेणूताई चव्हाण उपल्हिा रुग्णालयात आणले.

वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी गमेवाडीतील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालयात येऊन पोपट जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाठरवाडी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना

गमेवाडीतील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे. काही वर्षापुर्वी शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावरही असाच बिबट्याने हल्ला केला होता. त्यातून तोही बालंबाल बचावला होता. गमेवाडी हे गाव डोंगराच्या पायथ्याला असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आढळून येतो. रानडुकरे, वानरे या सारखे भक्ष्याची शिकार मिळत असल्याने बिबट्याचा गमेवाडी, पाठरवाडी भागात वावर आढळून येतो.