कराड प्रतिनिधी । तारीख 21 जुलै 2021, वेळ रात्री 11 ची ती काळीकुट्ट रात्र पाटण तालुक्यातील काही गावं व कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली. भूस्खलन, महापूर आपत्तीत तब्बल अडतीसहून अधिक जणांचा मातीच्या ढिगार्याखाली अडकून तर काहींचा महापुरात वाहून मृत्यू झाला. राहती घरं, घामाने आणि कष्ठाने पै पै गोळा करून उभा केलेला संसार आणि आपल्या पोराबाळांसह अनेक कुटुंबांना निसर्गाने जलसमाधी दिली. त्या काळरात्रीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहे.
कधीही न भरून येणार्या हानीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या काळ्या आठवणींच्या जखमा आजही भळभळत आहेत. सध्या कोयना धरण परिसरातील अनेक दुर्गम अशी गावे भूस्खलनाच्या छायेखाली आहेत. अशा गावांमधील लोकांना अतिवृष्टीच्या काळात प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांचा आसरा घ्यावा लागतो. अतिवृष्टी झाली कि येथील नागरिकांची स्थिती पुढे आड आणि मागे विहीर अशी होते. गावात डोंगर पडण्याची भीती आणि ज्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत तिथे भूस्खलनामुळे इमारत पडण्याची भीती, अशा दुहेरी संकटातून नागरिक आपले जीवन जगत आहेत.
आजवर अनेक वर्षे भूकंप,अतिवृष्टी, महापूर पाचवीलाच पूजलेल्या पाटण तालुक्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनामध्ये काही गावांतील कुटुंबेच्या कुटुंबे, घरादारांसह अक्षरशः मातीत गाडली गेली. शेवटचा मोकळा श्वासही त्यांच्या नशिबात नव्हता, यासारखे दुःख नाही. निसर्गाचा हा प्रकोप स्थानिकांच्या मुळावर नक्की का उठला याचे उत्तर कोणालाच मिळाले नाही. ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून याच तालुक्यात अनेक धरणे जन्माला घातली. राज्यातील जनतेची तहान भागवून त्यांच्या जीवनात प्रकाश पाडला, दुर्दैवाने त्याच भूमिपुत्रांच्या बहुसंख्य गावांतील हा अंधार जीवघेणा ठरला आहे.
ढगफुटी, अतिवृष्टी, भूस्खलनामध्ये जीवित व वित्तहानी झाली. यापूर्वीही 11 डिसेंबर 1967 चा विनाशकारी भूकंप या तालुक्याने पचवला होता. त्याकाळातही धरतीने शेकडो भूमिपुत्रांना आपल्या मिठीत घेतले होते. दुर्दैवाने तो भूकंप आणि दोन वर्षांपूर्वीच्या प्रलयामध्ये अनेकांचे संसार, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक, जीवित व वित्तहानी झाली. निसर्गाच्या या प्रकोपामुळे तालुक्यातील अनेक गावांत ढगफुटीमुळे नद्या, ओढे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलून गेले. सागरासारखे पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसल्याने शेकडो एकर शेती, पिके जमिनींसह वाहून गेली. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, कोयना, मोरणा, पाटण, चाफळ, तारळे, ढेबेवाडी आदी भागात अनेक रस्ते खचले, वाहून गेले. तीच अवस्था छोटे पूल, फरशी पुलांचीही झाल्याने अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला.
65 वर्षात झाले पुनर्वसन नाही.
1967 साली या परिसरात मोठा भूकंप झाला होता. या प्रलंयकारी भूकंपामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. धाब्याची घरे पत्त्यासारखी कोसळली होती. ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून इथले प्रकल्पग्रस्त आजही संघर्ष करत आहेत. या प्रकल्पग्रस्तांचे आजतागायत 65 वर्षात झाले पुनर्वसन झालेले नाही.