सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु महामार्गावर शनिवार -रविवार सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी महाबळेश्वर, कास पठार याठिकाणी पर्यटक निघाल्याने खंबाटकी घाटातील वाहतूक व्यवस्था सकाळपासून कोलमडली आहे. घाटातील सहाव्या वळणावरील दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे घाटाची वाहतूक पूर्णपणे संथगतीने सुरु आहे. खंडाळा पोलीस तसेच भुईंज पोलीस महामार्ग मदत केंद्राचे व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले जात आहे.
सध्या सातारा – लोणंद रस्त्यावरील पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामामुळे या मार्गावरील जड आणि मोठी वाहने खंबाटकी घाट असलेल्या राष्ट्रीय महामार्गाकडे वळवण्यात आलेली आहेत. त्यामुळे या घाटात गाड्यांची गर्दी झालेली पहायला मिळत आहे. अशात घाटातील रस्त्यावर ट्रक बंद पडल्यामुळे घाटात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
सातारा व पुणे जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट असलेल्या पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात आज सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या घाट मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.