कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या कोयता गॅंगचे प्रमाण भलतेच वाढलेले दिसून येत आहे. या गँगमध्ये खासकरून तरुण युवकांचा समावेश आहे. चार ते पाच युवकांकडून एकत्रित येत गॅंग करून शहरात ठिकठिकाणी दहशत माजविण्याचा प्रकार केले जात आहेत. अशीच घटना शनिवारी रात्री घडली. साताऱ्यातील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात युवकांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करत एका चारचाकी गाडीची तोडफोड केली. या हल्ल्यात सुदैवाने गाडीतील कोणीही जखमी झाले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील बसप्पा पेठेतील चौकात असलेल्या सोनार चौकात काही युवक चारचाकी गाडी (क्रमांक MH 11 DD 3126) ही थांबवून परिसरात असणाऱ्या पानटपरीवर थांबले होते. थोडावेळ तिथे थांबल्यानंतर ते युवक पुन्हा चारचाकीत बसले. याचवेळी त्या ठिकाणी काही युवकांचे एक टोळके आले. या युवकांनी कोयते काढत चारचाकीवर हल्ला केला.
यावेळी काही कळण्याच्या आतमध्ये हल्लेखोर युवकांनी चारचाकीच्या काचा फोडत गाडीतील युवकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याला आतील युवकांनी प्रतिकार केला. परिसरात गर्दी झाल्याने संबंधित हल्लेखोर त्याठिकाणाहून पसार झाले. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माहिती घेत हल्लेखोर युवकांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवला होता. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.