सोमंथळीच्या हद्दीत चारचाकीची दुचाकीस्वारास भीषण धडक; सस्‍तेवाडीचा युवक ठार तर एक गंभीर

0
246
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | बारामतीहून फलटणकडे येणाऱ्या चारचाकीने फलटण तालुक्यातील सोमंथळी गावच्या हद्दीतील सरकारी मळ्यानजीक एका दुचाकीस्वारास भीषण धडक दिली. यामध्ये सस्तेवाडी (ता. फलटण) येथील सद्दाम फरास हा युवक जागीच ठार झाला, तर त्याच्‍याबरोबर असणारा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.

युवराज चव्हाण असे जखमी युवकाचे नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण ते बारामती मार्गावरील सोमंथळी (ता. फलटण) येथील सरकारी मळ्यानजीक महामार्गावर सद्दाम फरास, युवराज चव्हाण हे सस्तेवाडीहून दुचाकी (एमएच ११ सीआर ००६४) वरून कामासाठी बारामतीकडे निघाले होते. त्‍यावेळी बारामतीहून येणाऱ्या चारचाकी (एमएच ४२ एएफ ९६००) समोरून त्‍यांच्‍या दुचाकीस धडक दिली.

ही धडक एवढी जोरात होती, की त्‍यात सद्दाम फरास हा जागीच ठार झाला, तर बरोबर असणारा युवराज चव्हाण हा गंभीर जखमी झाला. यावेळी मोटारीने त्‍यांच्‍या दुचाकीला १०० फूट दूर ओढत नेले. अपघातानंतर चालक पलायन करण्याच्या प्रयत्नात होता; परंतु सोमंथळी ग्रामस्थांनी त्याला पकडून ठेवले. त्‍यामुळे तो पळून जाऊ शकला नाही. राजेश सुभाष मत्रे (रा. भिगवण, बारामती) असे मोटार चालकाचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्‍यातील अजित पिंगळे व प्रदीप खरात हे पुढील तपास करीत आहेत.