पाटण प्रतिनिधी | गुजरवाडी, ता. पाटण येथील घाटात तीव्र वळणावरून चारचाकी मारूती अल्टो गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एक ते दीड हजार फूट खोल दरीत कोसळल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीचा चालक शहाजी व्यंकट भिसे (52, रा. नाडे-नवारस्ता) हा या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी कराड येथे दाखल करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाडे-नवारस्ता, ता. पाटण येथील शहाजी व्यंकट भिसे (वय 52, सध्या रा. पाटण) हे स्वत: गुरूवार दि. 14 रोजी मारूती अल्टो कारमधून (एम. एच. 50 ए. 2173) तारळे येथे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आटोपून पुन्हा पाटणच्या दिशेने निघाले होते. गाडी गुजरवाडी घाटात आली असताना 5.15 वाजण्याच्या सुमारास अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एक ते दीड हजार फूट खोल दरीत पलटी खात जावून कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच पाटणचे पोलीस निरीक्षक विकास पाडळे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, कर्मचारी नागनाथ भरते, वैभव पुजारी, उमेश मोरे, राजेंद्र पगडे, सुरेश चिंचकर, राहूल हजारे, शरद गुरव, संतोष माने आदी घटनास्थळी दाखले. पोलीस कर्मचाऱ्यांसह किंगमेकर ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दरीत उतरून झोळीच्या माध्यमातून चालक शहाजी भिसे यांना बाहेर काढले.
त्यानंतर त्यांना तात्काळ पाटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानतंर अधिक उपचारासाठी कराड येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाता गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. शहाजी भिसे हे पाटण येथील वीज वितरण कंपनीमध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहेत. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत पाटण पोलिसात करण्याचे काम सुरू होते.