सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पोलिसांकडून 36 हजाराचा दंड वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे. दरम्यान, चाफळ परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवत रविवारी कारवाई करण्यात आली. मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या सुमारे ५५ वाहनांवर चाफळ पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे ३६ हजार‌ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पोटे, पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ, पोलीस हवालदार मोरे, संदीप घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे, गृहरक्षक निकम, यादव यांनी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंकित चाफळ दूरक्षेत्र हद्दीत डेरवण येथे नाकाबंदी करून ५५ वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून ३६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

सडावाघापूर पठारावर हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे, गाडीतील टेप रेकॉर्डर लावून धिंगाणा घालणे या प्रकारची हुल्लडबाजी सडावाघापूरला मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पाटण पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत. पोलिसांच्यावतीने हुल्लडबाजावर करडी नजर राहणार असून पाटण पोलिसांच्या वतीने सडावाघापूर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे.