पाटण प्रतिनिधी । डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपात घुसलेल्या बिबट्याने गायीवर अचानक हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पाटण तालुक्यातील शिंगमोडेवाडी बनपुरी येथे घडलेल्या या हल्ल्याची घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार होण्याची येथील गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील डोंगरात वसलेल्या शिंगमोडेवाडी येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गावातील हणमंत मोहिते, अधिक मोहिते, सुभाष मोहिते हे शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरांचे कळप डोंगरात चरण्यासाठी घेऊन गेले होते. कळप चरत असताना संबंधित शेतकरी बाजूला झाडाखाली बसलेले होते. त्यावेळी भक्ष्याच्या मागावर आलेल्या बिबट्याने जनावरांच्या कळपात घुसून महादेव हरिबा मोहिते यांच्या गाभण गाईवर हल्ला केला.
त्यावेळी अन्य जनावरे भीतीने सैरभैर होऊन पळायला लागल्याने काही अंतरावर बसलेले शेतकरी तिकडे धावले. त्यावेळी मृत गायीला तेथेच सोडून बिबट्या पसार झाला. या घटनेबद्दल समजताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्या परिसरात त्यांनी बिबट्याचा शोध घेतला; परंतु तो आढळून आला नाही. वनविभागाच्या कार्यालयाला याबाबत कळविल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याचे सांगण्यात आले.