सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे का? तसेच या कोयत्या गॅंगला पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण कुणी रात्रीच्यावेळी तर कुणी दिवसाढवळ्या हातात कोयता घेऊन फिरताना दिसतो. अशीच घटना सातारा शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर काही तरुणांनी कोयता आणि तलवार घेऊन फिरताना आढळून आल्याची घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
प्रथमेश राजेंद्र गायकवाड, संकेत सुनील मांढरे आणि धीरज जयसिंग ढाणे (तिघेही रा. चिमणपुरा पेठ) तसेच आशीष विजय सणस (रा. ढोणे काॅलनी) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 14 आॅगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास शहरातील राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर काही युवक हातात कोयता घेऊन फिरत असल्याचा प्रकार दिसून आला.
पोलिस पेट्रोलिंग करत असताना तेथे काही तरुण पोलिसांना दिसून आले. त्यांच्या हातात कोयता आणि तलवार होती. संबंधितांनी विनापरवाना शस्त्र बाळगले होते. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी चाैघांवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार घोडके यांच्याकडून केला जात आहे.