कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील जखिणवाडी गावालगत असलेल्या कणसेमळा येथे मारामारीची घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी आता मारामारी करणाऱ्या 6 जणांविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज पाटील, प्रथमेश पाटील, अमर पाटील, जय पाटील, प्रदीप पाटील व एक अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, जखीणवाडी या ठिकाणी सहा जण कणसेमळा येथे फिर्यादी स्वप्नील कणसे यांच्या घराजवळ एकत्रित आले. त्यातील पंकज पाटील याने स्वप्नील कणसे यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर प्रतिक चव्हाण याला देखील मारहाण केली यामध्ये दोघेजण जखमी झाले. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी त्या ठिकाणी असलेला एकजण गेला असता प्रथमेश पाटील याच्या हातातील चाकू लागून त्यात तो जखमी झाला. अचानक मारामारी सुरु झाल्यामुळे स्वप्नील कणसे याच्या आई भांडणे सोडवण्यासाठी पुढे गेल्या असता पंकज पाटील याने त्यांना ढकलून दिले. यामध्ये त्याही जखमी झाल्या.
यानंतर पंकज पाटील याने स्वप्नील कणसे व साक्षीदार यांना लाथाबुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच संशयितांनी फिर्यादीच्या भाच्याचा मित्र सौरभ राजाराम धुमाळ याच्या घरी जाऊन त्याला व त्याच्या मामीला हाताने मारहाण केली. या प्रकरणी स्वप्नील कणसे याने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार मुळे यांच्याकडून केला जात आहे.