मलकापूरातील 16 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला घाबरून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना मलकापूर, ता. कराड येथे घडली आहे. या घटनेत संबंधित मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ३ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे.

करण थोरात, सचिन अण्णाप्पा दरागडे, सुमन अण्णाप्पा दरागडे (सर्व रा. हनुमान मंदिराशेजारी, दांगट वस्ती, मलकापूर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर सतीश शंकर सोनवणे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन शामराव सोनवणे (रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर, मलकापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शिवनगर दांगट वस्ती येथील सुमन सोनवणे यांचा नातू सतीश सोनवणे हा मंगळवारी दुपारच्यावेळी दांगट वस्तीत असलेल्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. त्यावेळी करण थोरात हा ‘माझ्यासोबत दारू प्यायला चल’, असे त्याला म्हणाला. मात्र, सतीशने त्याला नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन करण थोरात याने सतीशला शिवीगाळ, दमदाटी करीत त्याच्या चोचरे बोलण्यावरून टिंगल केली.

आपली टिंगल केल्याचे सहन न झाल्यामुळे सतीशने त्याला शिव्या दिल्या. याचा राग मनात धरून करण, त्याचा मामा सचिन दरागडे आणि आजी सुमन दरागडे या तिघांनी सतीशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सतीश तेथून पळत घरी गेला. काही वेळानंतर तिघेजण सतीशच्या घरासमोर आले. त्यांनी त्याला पुन्हा शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच ‘तू घरातून बाहेर पडलास की तुला जिवंत ठेवणार नाही, तुला मारून टाकणार,’ असे म्हणून त्यांनी धमकी दिली.

या सर्वांपासून थोडे दूर राहावे म्हणून त्याला एकट्याला घरात थांबण्यास सांगितले आणि त्याने गळफास घेऊन जीवन संपविले. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ठार मारण्याची धमकी देऊन सतीशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुमन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.