पाटणमध्ये ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या सात जणांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅली काढण्यात येणार होती. जातीचे व कुणबी दाखले काढताना होणाऱ्या अन्यायाबाबत ही रॅली काढली जाणार होती. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पाटणमध्ये मराठा समाजाच्यावतीने ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीला परवानगी नाकारल्याबाबत ६ ऑगस्ट रोजी संबंधितांना कळविण्यात आले होते. मात्र, तरीही ८ ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल संतोष पांडुरंग माने यांनी पाटण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर सखाराम मोरे (रा. मोरगिरी), शंकरराव विठ्ठलराव मोहिते (रा. पाटण), लक्ष्मण कृष्णत चव्हाण (रा. पाटण) यांच्यासह अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅली काढण्यात येणार होती. जातीचे व कुणबी दाखले काढताना होणाऱ्या अन्यायाबाबत ही रॅली काढली जाणार होती. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पाटणमध्ये मराठा समाजाच्यावतीने ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. संबंधित रॅली शहरातील मारुती मंदिर, रामपूर चौक येथे सुरू होऊन नवीन बसस्थानक, झेंडा चौक, लायब्ररी चौकमार्गे ते तहसील कार्यालय तसेच प्रांत कार्यालय, अशी काढली जाणार होती.

त्याबाबतचे निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने ५ ऑगस्ट रोजी पाटण पोलिसांना देण्यात आले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीमुळे शहरात वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांकडून ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी नाकारण्यात आली. रॅलीला परवानगी नाकारल्याबाबत ६ ऑगस्ट रोजी संबंधितांना कळविण्यात आले होते. मात्र, तरीही ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ ते १:५५ वाजण्याच्या दरम्यान सकल मराठा समाज पाटण यांच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.