साताऱ्यातील रिअल इस्टेट एजंटचा खून करून मृतदेह पूरला; 2 महिन्यानंतर उघडकीस आली घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी माहिती घेवून काही जणांची धरपकड केली. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हे कृत्य झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शहर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार शिवाजी नामदेव शिंदे (रा. सैदापूर, सातारा), अक्षण चव्हाण (पूर्ण नाव नाही, कोंडवे, ता. सातारा), विशाल उर्फ भैय्या खवळे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सतारा) आणि सुमीत भोसले (पूर्ण नाव नाही, रा. पाडेगाव, ता. खंडाळा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.  

संशयित शिवाजी शिंदे याचे संदीप संकपाळ यांच्याबरोबर जमीन विक्री कमीशनवरुन वाद झाला होता. यातून चिडून संदीप संकपाळ यांना २१ आॅगस्ट २०२३ रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावरुन संशयितांनी नेले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संकपाळ यांचा गळा आवळून खून करण्यात आला. तर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत सर्दचा ओढाजवळ वघळीत पुरून पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

साताऱ्यात ऑगस्टपासून एकजण होता बेपत्ता…

साताऱ्यातील जमीन खरेदी विक्री करणारा एजंट ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता होता. याप्रकरणी बेपत्ता एजंटच्या कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास सुरु केला. सुरुवातीला त्याबाबत काही माहिती मिळाली नाही. बुधवारी मात्र या घटनेत नाट्यमय घटना घडत गेल्या. व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आले. याप्रकरणी काही संशयितांची धरपकड करण्यात आली.

खून केल्यानंतर मृतदेह पुरला निर्जनस्थळी…

संशयितांनी साताऱ्यात खून केल्यानंतर तो मृतदेह लोणंद परिसरात निर्जनस्थळी पुरल्याचे सांगितले. पोलिस तपासात प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर तेही हादरुन गेले. संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर त्याबाबत खातरजमा करण्यात आली असता पोलिसांना मानवी सांगाडा मिळाला आहे. त्यासाठी तज्ञ बोलावून घटनास्थळ सील करण्यात आले.

खुनाचे नेमके कारण काय?

पोलिसांनी संशयितांकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केली असून खुनाचे नेमके कारण काय? खून कशाने केला? खून कुठे केला? खुनामध्ये नेमका किती जणांचा सहभाग आहे? खुनाचा उद्देश काय? असे प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.