चुकून 3 हजार रुपये ऑनलाईन गेलेले पैसे मागितले म्हणून ‘तिनं’ थेट ‘त्याला’ दिली धमकी; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना प्रत्येकजण खूप काळजी घेत असतो. अगदी डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर, पैसे तसेच पासवर्ड चेक करतो. मात्र, चुकून जर एखाद्याला पैसे गेलेच तर ते मागे मिळवण्यासाठी खूप आटापिटा करावी लागते. परंतु, या सर्व गोष्टींमध्ये जर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल तर भांडणही होण्याची शक्यता असते. असाच प्रकार सातारा शहरात घडला आहे. येथील एका व्यक्तीकडून चुकून ऑनलाईनद्वारे 3 हजार रुपये एका महिलेच्या अकाउंटवर गेले. हे पैसे परत देण्याची विनंती संबंधित व्यक्तीने केली असता उलट त्या व्यक्तीलाच महिलेने शिवीगाळ व धमकी दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलम चाैधरी (रा. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील हुसेन मेहबूब शेख (वय ४०, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा) यांच्याकडून चुकून एक अनोळखी महिलेच्या फोन नंबरबर तिच्या अकाउंटवर ऑनलाइन ३ हजार रुपये गेले. त्यानंतर त्यांनी फोन केला असता हा नंबर नीलम चाैधरी यांचा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर शेख यांनी माझे पैसे तुम्हाला चुकून पाठवले गेले आहेत ते परत करा, असे महिलेस सांगितले. मात्र, संबंधित महिलेने शेख यांना पैसे न देता शिवीगाळ करून धमकी दिली.

आपल्याशी महिला खोटं बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी थेट सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक माने हे करीत आहेत.