कराड प्रतिनिधी | जमिनीवर बँकेचा व पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतानाही त्याच जमिनीची मुदत खरेदी दस्त करून महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही महिलेला दिली होती. याप्रकरणी सुनंदा जालिंदर हजारे (रा. वराडे, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हणमंत शंकर कारंडे (रा. उंब्रज, ता. कराड), रामकृष्ण बाबुराव देसाई (रा. आणे, ता. कराड), विमल मधुकर सुपनेकर (रा. हिंगनोळे, ता. कराड) यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सुनंदा हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वराडे येथील स्वमालकीची जमीन मी घरगुती कारणास्तव गावातील एकाला ९ लाख ६० रूपयांना विकली होती. मिळालेले पैशाची हणमंत कारंडे याला माहिती होती. कारंडे हा उसने पैसे मागू लागला. पैसे देण्यास नकार दिल्याने कारंडे याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आणे गावच्या हद्दीतील गट नंबर ६३५ मधील सुमारे २१ गुंठे जमिनीचे क्षेत्र मुदत खरेदी म्हणून घेण्यास भाग पाडले. सुनंदा हजारेंनी आयडीबीआय बँकेच्या उंब्रज शाखेतील खात्यावरुन रामकृष्ण देसाई याला ३ लाख रुपये व त्यानंतर ४५ हजार रुपये आणि उर्वरित ६ लाख ५५ हजार रुपये, असे मिळून सुमारे १० लाख रुपये दिले व मुदत खरेदीचा नोटरी रजिस्ट्रर दस्त लिहून घेतला.
सदरचा व्यवहार हा एक महिन्याच्या मुदतीवर ठरलेला होता. व्यवहाराबाबतची मुदत होऊन बरेच दिवस झाले. त्यामुळे फिर्यादी महिलेने रामकृष्ण देसाई याला वारंवार फोन करुन तसेच समक्ष भेटून पैसे मागितले. परंतु, त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर हा प्रकार फिर्यादीने जावई व मुलींना सांगितला. तसेच त्यांनी अधिक चौकशी केली असता मुदत खरेदी केलेल्या जमिनीवर एका पतसंस्थेचा व एका बँकेचा बोजा असल्याचे समजले.
फसवणूक करणाऱ्या तिन्ही संशयितांनी एका हॉटेलवर बोलावून फिर्यादी सुनंदा हजारे यांना मारहाण तसेच शिवीगाळ दमदाटी केली. आम्ही तुझे पैसे देणार नाही. तू आमचे काय करणार आहे, ते आम्हीही बघतो. तू पोलिस ठाण्यात गेलीस, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित हणमंत कारंडे याच्या अनेक भानगडींची उंब्रज, कराड परिसरात चर्चा ऐकायला मिळते. उंब्रजमधील एका बांधकाम साईटमध्येही त्याची भूमिका वादग्रस्त ठरली आहे. त्याचा कराड, उंब्रजमधील दुय्यम निबंधक कार्यालयात सतत वावर असतो. दुसरा संशयित रामकृष्ण बाबुराव देसाई याने आपला ट्रॅक्टर विकला असताना तो चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. मात्र, ट्रॅक्टर चोरीचा बनाव केल्याप्रकरणी त्याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.