माजी नगरसेवक बाळू खंदारेवर खंडणीचा गुन्हा दाखल; ‘इतक्या’ लाखांची मागितली खंडणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका बांधकामाच्या ठिकाणचे साहित्य चोरून नेणे तसेच उद्योजकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी माजी नगरसेवक बाळू खंदारे याच्यासह सुमारे २५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सागर शिवाजी साळंखे (रा. सदरबझार) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंद झालेला आहे. तक्रारदार हे उद्योजक असून सातारा शहरातील शाहूनगरमध्ये त्यांनी सदनिका बांधलेल्या आहेत. या सदनिकाच्या शेजारी काही प्लाॅट आहेत. दि. १० नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांना मोबाइलवर काॅल आला.

या काॅलवरुन मी बाळासाहेब खंदारे बोलताेय. तू गोडोलीतील बांधकामाच्या ठिकाणची शाैचालय टाकी, चेंबर आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन काढून टाक असे सांगण्यात आले. यावरुन तक्रारदार साळुंखे यांनी मी का काढून टाकायचे अशी विचारणा केली. यावरुन त्यांना तु मला शिकवणार का ? असे म्हणून तु इकडे ये तुला तोडून टाकतो, इमारत पाडतो अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांनी कामावरील सुपरवायझरला विचारले असता नगरसेवक बाळू खंदारे आणि अनोळखी २० ते २५ जण लाकडी दांडके, राॅड, हाॅकी स्टीक घेऊन आल्याचे सांगितले. तर याचवेळी बांधकाम साहित्य नेऊन इमारतीत नुकसान करण्यात आले.

या घटनेनंतर इमारत न पाडणे, कंपाऊंड काढून घेणे, फलक हटविणे यासाठी बाळू खंदारे यांनी ५० लाखांची मागणी केली. तसेच सध्या सुरू असलेल्या बांधकामा शेजारील जागा घेण्यासही सांगितले, असेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुनच पोलिसांनी खंडणी, चोरीचा गुन्हा बाळू खंदारेसह समारे २५ जणांवर दाखल केला आहे.