सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात अलीकडे फसवणूक करून आर्थिक व्यवहार केल्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात दस्तीवेळी मूळ मालकाच्या जागी दुसऱ्याच महिलेला उभे करून व्यवहार करण्यात आल्याची घटना म्हसवड येथील मासाळवाडीत घडली आहे. येथील जमिनीची खरेदी बोगस दस्त करून केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीमती लक्ष्मी बजरंग कटकदौंडे (मूळ रा. म्हसवड, हल्ली रा. विक्रोळी (पूर्व, मुंबई) यांच्या मालकीची म्हसवड जमीन गट क्रमांक ८६० व आताचा नवीन मासाळवाडी जमीन गट नंबर ३०७ मध्ये सात हेक्टर ८६ आर, तसेच म्हसवड जमीन गट क्रमांक ७५० व आताचा नवीन मासाळवाडी जमीन गट नंबर २१२ मध्ये ४ हेक्टर २३ आर जमीन आहे.
दि. ४ सप्टेंबर २०१० रोजी यापैकी गट नंबर ३०७ मधील जमिनीपैकी दोन हेक्टर २७ आर जमिनीचे चंद्रकांत सोमेश्वर साखरे, महादेव सोमेश्वर साखरे व दीपक विलास तिवाटणे (सर्व खरेदीदार रा. म्हसवड), तुकाराम कृष्णा पावणे (रा. काळचौंडी, ता. माण) व संपत बनगर (रा. वरकुटे म्हसवड, ता. माण) (साक्षीदार), नंदकुमार सोमेश्वर साखरे (रा. म्हसवड) व मारुती बाळू पवार (ओळखदार), तसेच गट नंबर २१२ मधील ४ हेक्टर २३ आर जमिनीचे अंकुश भिवा वीरकर व मारुती अंकुश वीरकर (खरेदीदार), मारुती तुकाराम गजांकश व महेश नारायण सराटे (ओळखदार), विकास श्रीमंत दिडवाघ, हनुमंत महादेव कटकदौंडे, अमोल साहेबराव राऊत (वरील सर्व रा. म्हसवड, ता. माण) व एका अनोळखी महिला, अशा सर्व पंधरा जणांनी आपापसांत संगनमत करून लक्ष्मी कटकदौंडे यांच्या जागी दुसरी अनोळखी महिला उभी करून तसेच त्यांचे बनावट निवडणूक ओळखपत्र तयार करून ते वापरले.
त्या स्वतः सही करत असताना खरेदी दस्ताच्या पानावर निशाणी अंगठा बोगस उठवून दुय्यम निबंधक कार्यालय, दहिवडी येथे खरेदी दस्त करून लक्ष्मी कटकदौंडे यांची फसवणूक केली. त्यामुळे वरील खरेदी दस्तातील खरेदीदार, ओळखदार, साक्षीदार व अनोळखी महिला यांच्याविरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.