सातारा प्रतिनिधी | गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, तसेच मंडळासमोरील सजावटीदरम्यान लेझर बीम लाइट वापरण्यास असणाऱ्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तीन मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ध्वनिक्षेपक यंत्रणेचा आरोग्यावर, तसेच लेझर बीम लाइटचा डोळ्यावर दुष्परिणाम होत असल्याने गणेशोत्सव याचा वापरावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बंदी घातली आहे. यानंतरही अनेक मंडळांकडून लेझर बीम लाइटचा वापर सुरू होता. यानुसार सातारा शहर पोलिस ठाण्याचे गस्तीपथक ■ शुक्रवारी विविध ठिकाणी फिरत होते. यापैकी एका पथकास रविवार – पेठेतील लोणार गल्लीत असणाऱ्या श्रीनाथ गणेशोत्सव मंडळासमोर लेझर बीम लाइटचा वापर सुरू असल्याचे दिसले. याची तक्रार हवालदार सागर निकम यांनी नोंदवली आहे. यानुसार ओंकार संजय कवठेकर (रा. रविवार पेठ) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दुसऱ्या गस्ती पथकास सदरबझारमधील नवीन म्हाडा कॉलनीतील श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातही लेझर बीम लाइटचा वापर सुरू असल्याचे आढळले. यानुसार कैलास सिद्धय्या भंडारे (रा. जरंडेश्वर नाका) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार हवालदार गणेश जाधव यांनी नोंदवली आहे.
तिसऱ्या पथकाने पिरवाडी येथील यमुनानगरमधील एका मंडळात लेझर बीम लाइटचा वापर प्रकरणी संतोष लक्ष्मण निकम (रा. बोरखळ, ता. सातारा) यांच्यावर कारवाई करत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याची तक्रार हवालदार धीरज मोरे यांनी नोंदवली आहे. याचा तपास हवालदार देशमुख आणि टोळे हे करीत आहेत.