विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | गमेवाडी येथील एका विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली. ग्रामस्थांच्या माहितीनंतर वन विभागाकडून बछड्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गमेवाडी येथील बोडका नावाच्या शिवारातील उत्तम जाधव यांची ही विहीर आहे. त्या विहिरीत बछडा पडला. आज सकाळी उत्तम जाधव यांचे बंधू दादासाहेब जाधव हे सकाळी शेतात गेल्यावर त्यांच्या विहिरीत बछडा पडला असल्याचे लक्षात आले.

त्यांनी तातडीने वन सेवक मयूर जाधव, उत्तमराव जाधव व पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वन विभागाकडून संबंधित बछड्याला सुखरूप बाहेर काढले.