पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील पाळशी येथे जनावरे डोंगरातून चरून घराकडे येत असताना जनावरांच्या कळपातील बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पळशी येथील शेतकरी दररोज जनावरे चारायला डोंगरात घेऊन डोंगरावर जनावरे घेऊन चरायला जातात. पळशी गावाजवळ असलेल्या मांजरमाळ नावाच्या शिवारात नेहमीप्रमाणे येथील काशिनाथ विठ्ठल लोखंडे व इतर शेतकरी जनावरे चारायला घेऊन गेले होते. ते जनावरे सोडून परत आले तेव्हा जनावरे राखण्यासाठी गणेश लोखंडे व गौरव घोलप हे दोघे थांबले होते. सायंकाळी जनावरे घरी घेऊन जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जनावरांच्या कळपात शिरल्याने जनावरे इकडे तिकडे पळू लागली.
त्यामुळे जनावरे घेऊन निघालेले युवक व शेतकरी गावाच्या दिशेने जीव वाचवण्यासाठी पळत गेले. मात्र त्यावेळी बिबट्याने जनावरांच्या कळपातील बैलावर हल्ला चढवून त्याला मारले. बिबट्याच्या भीतीने रात्री बैलाचा शोध घेतला नाही. सकाळी लोक पुन्हा तिकडे गेले असता अर्धवट खाल्ला असल्याचे दिसून आले. त्यानंतर तत्काळ वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पाहणी करून पंचनामा केला.